Home » महाराष्ट्र » पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का : महिला नेत्याचा शिंदे सेनेत प्रवेशाच्या चर्चांना उधाण !

पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का : महिला नेत्याचा शिंदे सेनेत प्रवेशाच्या चर्चांना उधाण !

पंढरपूर : वृत्तसंस्था

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून, दिवंगत आमदार भारत भालके यांच्या स्नुषा आणि भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या प्रणिता भालके यांनी भाजपच्या उमेदवाराचा तब्बल ११ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला. या विजयासह तब्बल १४ वर्षांनंतर पंढरपूरमध्ये सत्तांतर घडून आले आहे.

या निकालामुळे भाजपचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाला मोठा राजकीय झटका बसला आहे. पंढरपूरसारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रात भाजपला पराभव पत्करावा लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, प्रणिता भालके यांच्या विजयानंतर भालके कुटुंबाच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चांना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भालके कुटुंब लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहे. भगीरथ भालके यांनी या दृष्टीने हालचाली सुरू केल्याचे समजते. नुकतीच त्यांनी माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली असून, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे.

विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “पंढरपूरचा नगराध्यक्ष आपलाच विजयी झाला आहे,” असे जाहीर विधान केल्याने भालके कुटुंबाच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेशाच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. शिंदे यांच्या या विधानाकडे भालके यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.

भालके कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी लक्षवेधी आहे. दिवंगत भारत भालके हे काँग्रेसचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर स्थानिक पातळीवर तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन करत प्रणिता भालके यांनी नगरपरिषद निवडणूक लढवली आणि मोठे यश संपादन केले.

या विजयानंतर पंढरपूरमध्ये भालके समर्थकांनी जल्लोष साजरा करत गुलाल उधळला. कोट्यवधी रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांमुळे ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. आता भालके कुटुंब शिंदे शिवसेनेत दाखल झाल्यास पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *