Home » महाराष्ट्र » मोठी बातमी : अजित पवार यांच्या निधनानंतर सीआयडी चौकशीचा आदेश

मोठी बातमी : अजित पवार यांच्या निधनानंतर सीआयडी चौकशीचा आदेश

बारामती : वृत्तसंस्था

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (28 जानेवारी) बारामती येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून, राज्यभर शोककळा पसरली आहे. गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवाला चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित हजारो समर्थकांनी ‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर केला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवरही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, या विमान अपघाताच्या तपासाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, राज्य सरकारने दुर्घटनेची CID चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तपास प्रक्रियेत कोणतीही छेडछाड होऊ नये यासाठी अपघातस्थळावर कोणालाही प्रवेश देऊ नये, अशा स्पष्ट सूचना बारामती पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

याआधीच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देत विमानाचे अवशेष, जळालेल्या भागांचे नमुने आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत. हा संपूर्ण तपास बारामती पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या ‘एक्सिडेंटल डेथ रिपोर्ट’च्या अनुषंगाने केला जाणार आहे. CID तपासात फॉरेन्सिक अहवाल, एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) लॉग्स तसेच प्राथमिक तांत्रिक माहितीचा सखोल अभ्यास केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार, 28 जानेवारी रोजी सकाळी 8.18 वाजता विमानाने बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोलशी पहिल्यांदा संपर्क साधला होता. त्या वेळी हवामान सामान्य, वाऱ्याचा वेग कमी आणि दृश्यमानता सुमारे 3000 मीटर असल्याची माहिती वैमानिकांना देण्यात आली होती. वैमानिकांनी रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत असल्याचे कळवले होते. मात्र, रनवे स्पष्ट दिसत नसल्याचे त्यांनी एटीसीला सांगितले. सकाळी 8.43 वाजता रनवे लँडिंगसाठी सज्ज असल्याची माहिती एटीसीकडून देण्यात आली. त्यानंतर मात्र पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला अचानक मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, अशी माहिती एटीसीवर कार्यरत अधिकाऱ्याने दिली. या दृश्यामुळे नियंत्रण कक्षातही एकच खळबळ उडाली होती.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *