Home » महाराष्ट्र » ग्राहकांसाठी मोठी बातमी : ऑनलाइन पेमेंटसाठी झाला मोठा बदल !

ग्राहकांसाठी मोठी बातमी : ऑनलाइन पेमेंटसाठी झाला मोठा बदल !

मुंबई: वृत्तसंस्था

गेल्या काही वर्षापासून देशात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पेमेंट सुरु झाले असून आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने मोठ्या व्यवहारांसाठी UPI ची मर्यादा वाढवली असून, १५ सप्टेंबर २०२५ पासून हे नवे नियम लागू झाले आहेत. यानुसार, व्हेरिफाइड मर्चंटसोबत आता एका दिवसात १० लाख रुपयांपर्यंत ऑनलाइन पेमेंट करता येईल. या बदलामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक, विमा प्रीमियम, क्रेडिट कार्ड बिल आणि कर्जाचे हप्ते (EMI) यांसारख्या मोठ्या व्यवहारांसाठी UPI वापरणे अधिक सुलभ आणि जलद होणार आहे.

नव्या नियमांनुसार, फोनपे, पेटीएम, गूगल पे यांसारख्या UPI अ‍ॅप्सवर मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यासाठी वारंवार पेमेंट करण्याची गरज भासणार नाही. यामुळे पेमेंट प्रक्रिया अधिक सोपी आणि कार्यक्षम होईल. विशेषत: क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी एका वेळी ५ लाख रुपये आणि एका दिवसात जास्तीत जास्त ६ लाख रुपये भरण्याची मर्यादा आहे. तसेच, प्रवासाशी संबंधित पेमेंटसाठीही एका वेळी ५ लाख रुपये आणि कर्ज व EMI पेमेंटसाठी प्रति व्यवहार ५ लाख रुपये, तर एका दिवसात १० लाख रुपये भरण्याची सुविधा आहे.

व्हेरिफाइड मर्चंटसोबतच्या व्यवहारांसाठी मर्यादा वाढवण्यात आली असली, तरी दोन व्यक्तींमधील (पर्सन-टू-पर्सन) व्यवहाराची दैनंदिन मर्यादा १ लाख रुपये कायम राहील. यामुळे व्यक्तीगत व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच, UPI अ‍ॅप्सच्या दैनंदिन आणि तासिक व्यवहार मर्यादांमध्येही बदल झालेला नाही. यामुळे यूजर्सना मोठ्या व्यवहारांसाठी सुविधा मिळेल, तर नियमित छोटे व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.

यापूर्वी फोनपे वापरणाऱ्या किमान KYC असलेल्या यूजर्सना दररोज १०,००० रुपये, तर पूर्ण KYC असलेल्या यूजर्सना प्रति व्यवहार २ लाख रुपये आणि दररोज ४ लाख रुपये ट्रान्सफर करता येत होते. पेटीएमवर दररोज १ लाख रुपये, प्रति तास २०,००० रुपये आणि प्रति तास जास्तीत जास्त ५ व्यवहार करता येत होते. गूगल पेवर दररोज १ लाख रुपये आणि जास्तीत जास्त २० व्यवहारांची मर्यादा होती. आता नव्या नियमांमुळे मोठ्या व्यवहारांसाठी या अ‍ॅप्सवरील प्रक्रिया अधिक सुलभ होईल.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *