Home » महाराष्ट्र » मोठी बातमी : मनसेच्या मोर्चात शिंदेंचे मंत्री सहभागी होताच आंदोलक आक्रमक !

मोठी बातमी : मनसेच्या मोर्चात शिंदेंचे मंत्री सहभागी होताच आंदोलक आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जोरदार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास पाठिंबा देण्यासाठी आलेल्या परिवहन मंत्र्यांना आंदोलकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या उपस्थितीविरोधात “पन्नास खोके… जय गुजरात” अशा घोषणा दिल्या. या गोंधळादरम्यान एका आंदोलकाने त्यांच्या दिशेने बाटली भिरकावल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत मंत्र्यांना सुरक्षितपणे त्या ठिकाणाहून बाहेर काढले.

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, मनसेचा मोर्चा सुरुवातीला शांततेत सुरू होता. मात्र, आमदार प्रताप सरनाईक घटनास्थळी पोहोचल्यानंतर वातावरण चिघळले. त्यांच्याविरुद्ध “सरनाईक गो बॅक” अशा घोषणा देण्यात आल्या. परिस्थिती तणावपूर्ण होताच सरनाईकांनी त्वरित आंदोलनातून माघार घेतली. “मी केवळ मराठी माणसांना पाठिंबा देण्यासाठी आलो होतो,” असे स्पष्टीकरण प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिले.

प्रताप सरनाईक म्हणाले, या आंदोलनात काही समाजकंटकही घुसले आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. माझ्यासोबत मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आहेत. त्यामुळे बाकीच्यांना जे काय राजकारण करायचय ते करु द्या. प्रताप सरनाईक मीरा-भाईंदरमधील मराठी जनांच्या पाठिमागे ठामपणे उभा आहे.

पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, माझी भूमिका ही मोर्चाला पाठिंबा देण्याची होती, डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी बेकायदपणे आमच्या मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली, त्याचा निषेध करण्यासाठी आलो. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा देत असाल, तर या मोर्चाला सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे अशी माझी भुमिका होती.

हा मोर्चा सुरूच असून या ठिकाणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह नितीन सरदेसाई, उद्धव ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर, राजन विचारे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मीरा – भाईंदर मध्ये पोहोचले आहेत. संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांचे मनसैनिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. थोड्याच वेळात मनसे नेते अविनाश जाधव हे देखील मोर्चात सहभागी होण्यासाठी पोहोचणार आहे. त्यांना रात्रीच पोलिसांनी अटक करुन पालघर येथे नेले होते.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *