Home » महाराष्ट्र » लाडक्या बहिण योजनेतील लाभार्थ्यांसाठी वर्षाअखेरीस मोठा दिलासा?

लाडक्या बहिण योजनेतील लाभार्थ्यांसाठी वर्षाअखेरीस मोठा दिलासा?

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करण्यात आली असून, सामाजिक न्याय, महिला व बाल विकास आणि आदिवासी विकास अशा महत्त्वाच्या विभागांकडून कोट्यवधींचा निधी या योजनेकडे वळवण्यात आला आहे. सोमवारी विधानसभेत सादर झालेल्या पुरवणी मागण्यांनुसार, सामाजिक न्याय विभागाकडून 671.35 कोटी, महिला व बाल विकास विभागाकडून 4882.56 कोटी, तर आदिवासी विकास विभागाकडून 549.29 कोटी रुपये या योजनेसाठी दिले जाणार आहेत.

महिलांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेला पुरवणी निधी मिळाल्यामुळे सरकारने महिलांसाठी व्यापक स्तरावर उपक्रम राबवण्याची तयारी केली असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यातील महिलांना समान संधी देणे आणि सामाजिक समावेशन वाढवणे हा या योजनेचा उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

तथापि, या निधीवाटपामुळे संबंधित विभागांत नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः सामाजिक न्याय विभागाच्या अनेक महत्त्वाच्या योजनांसाठी आधीच निधी अपुरा असून, आता पुन्हा मोठी रक्कम वळवल्याने भविष्यात काही योजनांच्या हप्त्यांमध्ये विलंब होण्याची शक्यता वाढली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही हे वास्तव मान्य केले असून यामुळे विभागीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.

यापूर्वीही या विभागाचा निधी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेकडे वळवल्याने महायुतीमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे या नव्या निधीवाटपावरून पुन्हा एकदा राजकीय तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *