सातारा : वृत्तसंस्था
राज्यभर गेल्या महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक घरं, दुकाने आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या पूरग्रस्त या भीषण स्थितीतून सावरत आहेत. त्यातच आता अतिवृष्टी व पुरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाचा मोठा दिलासा दिला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी १ हजार ३५६ कोटी ३० लाख रुपयांच्या मदतीची मदत जाहीर केली आहे.
राज्यभर अतिवृष्टीने अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतातलं उभी पिके वाहून गेली असून मातीही खरवडून गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील पूरग्रस्त गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या शेतकऱ्यांना भेटून त्यांना धीर दिला. घरातील धान्य, भांडे आणि इतर वस्तूंचा अक्षरशः चिखल झाला. या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांना धीर दिला.
रस्ते आणि पुलाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने दुरुस्तीचं काम हाती घेण्याच्या सूचना दिल्या.याव्यतिरिक्त, आपत्तीमध्ये मयत झालेल्यांच्या वारसांना, पशुधनाचे नुकसान व घर पडझड झालेल्या कुटुंबांनाही जिल्हास्तरावरून तत्काळ मदत दिली जाणार आहे. अतिवृष्टी आणि पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी संवेदनशील महाराष्ट्र शासन ठामपणे उभं आहे, असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.
१५ लाख १६ हजार ६८१ हेक्टर क्षेत्र बाधित..
अतिवृष्टी आणि पूरामुळे बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १५ लाख १६ हजार ६८१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. तसेच २१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांना फटका बसला. राज्य दिवाळीपूर्वी सर्व मदत लोकांपर्यंत पोहोचेल, अशी ग्वाही देणात आली होती. अतिवृष्टी आणि पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी संवेदनशील महाराष्ट्र शासन ठामपणे उभं आहे, असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले. काल राज्य शासनाने १ हजार ३५६ कोटी ३० लाख रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय निर्गमित केला असून, ही मदत तात्काळ जिल्हास्तरावरूनच वितरित करण्यात येणार आहे.
जिल्हानिहाय मदत पुढीलप्रमाणे..
-बीड : ५७७ कोटी ७८ लाख
-धाराशिव : २९२ कोटी ४९ लाख
-लातूर : २०२ कोटी ३८ लाख
-परभणी : २४५ कोटी ६४ लाख
-नांदेड : २८ कोटी ५२ लाख
-सातारा : ६ कोटी २९ लाख
-कोल्हापूर : ३ कोटी १८ लाख
