मुंबई : वृत्तसंस्था
माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या मते, “लोक भाजपकडे नेहमी संशयाने पाहतात. भाजपने खांद्यावर हात टाकले तरी लोक म्हणतात, हा मेला. भाजप म्हणजे विषारी सापासारखी पार्टी आहे. भाजपसोबत न दोस्ती, न दुश्मनी ठेवलेली बरी; आम्ही तर दुश्मनी करुण बसलो, ते कधीही नाग पाठवू शकतात.”

28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे अकाली निधन झाले, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मुंबईहून बारामतीला येत असताना लँडिंगपूर्वी विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि नंतर झालेल्या स्फोटात पवारांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बच्चू कडू यांनी एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना भ्रष्टाचारावरही टीका केली. त्यांनी सांगितले की, पूर्वी सिव्हिल सर्जनकडे असलेले औषध खरेदीचे अधिकार आता मंत्रालयाने स्वतःकडे घेतल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळाला असून, कमिशनसाठी औषधे महाग केली जात आहेत. ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणाऱ्यांवर आता टेंडरच्या माध्यमातून भ्रष्टाचार होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी एमआरइजीएसचे पैसे आणि दिव्यांगांच्या रखडलेल्या पगारावरून सरकारला धारेवर धरले.
शासनाच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, पंधराशे रुपये देऊन मते मिळवण्याचा प्रयत्न होत असला तरी, दुसरीकडे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सरकार जनतेचे पैसे लुटत आहे. “एकीकडून द्यायचे आणि दुसरीकडून काढून घ्यायचे ही सरकारची नीती आहे,” असेही त्यांनी म्हटले. शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्यास महाराष्ट्रात रेल्वे सेवा चालवली जाणार नाही, असा इशारा देत बच्चू कडू यांनी आगामी काळात गनिमी काव्याने आंदोलन करण्याचे संकेत दिले आहेत.


