अमळनेर : प्रतिनिधी
मंगरूळ येथील तरूणाचा चंद्रपूर जिल्ह्यात मृतदेह आढळून आला असून हा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. प्रफुल्ल प्रकाश भदाणे (३५) असे मयताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल हा २२ रोजी एका वाहनावर चालक म्हणून गेलेला होता. २४ रोजी तो चंद्रपूरच्या हद्दीत खंबाळा येथे जेवायला थांबला होता. काही वेळाने प्रफुल्लने त्याचा भाऊ प्रदीप भदाणे याला फोन केला होता की, काही लोक मला मारत आहेत आणि मी पळत आहे. प्रदीपने त्याला त्या मारणाऱ्या व्यक्तींजवळ फोन द्यायला सांगितला. प्रदीपने त्यांना विनंती केली की, मी पैसे पाठवून देईन. प्रफुल्लला दवाखान्यात दाखल करा. त्यांनी ‘हो’ म्हटले आणि फोन बंद केला. दोन-तीन दिवस वाट पाहूनही भाऊ आला नाही आणि फोनही लागत नाही, त्यामुळे प्रदीपने अमळनेर पोलिस स्टेशनला हरवल्याची खबर दिली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला.



