जळगाव : प्रतिनिधी
कौटुंबिक हिंसाचाराच्या दाखल गुन्ह्यामध्ये अटक न करणे, योग्य ती मदत करणे तसेच वरिष्टांना अहवाल न पाठविण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना १४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये शहर पोलिस ठाण्याचा पोलिस हवालदार रवींद्र प्रभाकर सोनार (वय ४६) व पोलिस नाईक धनराज नारायण निकुंभ या दोघांचा समावेश आहे. दरम्यान, ज्या दाखल गुन्ह्यात मदतीसाठी दोघांनी लाच मागितली त्या गुन्ह्याचा तपास या दोघांकडेही नसून अन्य हवालदाराकडे आहे. त्यामुळे तिघांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हे केंद्रीय अर्ध सैनिक बलमध्ये कॉन्स्टेबल आहेत त्यांचे पत्नीसोबत कौटुंबिक कारणावरून भांडण झाल्याने त्यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक होऊ नये, योग्य ती मदत व्हावी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल न पाठवण्यासाठी शहर पोलिस ठाण्याचा पोलिस हवालदार रवींद्र सोनार याने पोलिस नाईक धनराज निकुंभयाच्यामार्फत ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती २० हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला. त्यानुसार ११ एप्रिल रोजी रात्री सोनार याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी रवींद्र सोनार व धनराज निकुंभ या दोघांना अटक करण्यात येऊन शनिवारी न्यायालयात हजर केले दोघांनाही १४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. नीलेश चौधरी यांनी काम पाहिले.
ज्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी सोनार व निकुंभ या दोघांनी लाच मागितली त्या गुन्ह्याशी दोघांचा काहीही संबंध नाही. तपासाधिकारी तिसराच कर्मचारी आहे. त्यामुळे लाचखोर दोघे व तपासाधिकारी या तिघांची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक असल्याचा मुद्दा एसीबीने न्यायालयासमोर मांडला. तसेच गुन्ह्याशी संबंध नसताना दोघांनी कोणासाठी व कोणाच्या सांगण्यावरून लाच मागितली, यात आणखी कोणाकोणाचा संबंध आहे का, याचीही चौकशी केली जाणार आहे.



