चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील वाढत्या गुंडगिरीवर अंकुश ठेवण्यासाठी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळत आहे. तर सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांची पोलीस निरीक्षकांनी धिंड काढली.

सविस्तर वृत्त असे की , शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी ऑपरेशन कोम्बिंग अंतर्गत पो. नि. मनेळ यांनी रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. अवैध शस्त्रांचीही जप्ती करण्यात आली आहे. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्यावर पोलिस अधिनियमातील संबंधित कलमानुसार कारवाई करून त्यांना समज देण्यात आली आहे. तर शुक्रवारी भीमनगर परिसरात झालेल्या हाणामारीत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या भावेश घनःश्याम गोयर, राज विनोद बकर, मयूर विनोद चव्हाण आणि अविनाश जगदीश गोयर (रा. मेहतरवाडा) यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर मेहतरवाडा ते चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यापर्यंत या सर्वांची धिंड काढण्यात आली. पोलिसांनी त्यांना पोलिसी हिसका दाखवत कायदेशीर कारवाई केली. या धडक मोहिमेत पीएसआय योगेश माळी, संदीप घुले यांच्यासह पोलिस पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या कारवाईमुळे शहरातील गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. याबद्दल पो.नि. अमितकुमार मनेळ यांच्या शहरातून कौतुक होत असून सामान्य नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे.



