Home » राज्य » ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न !

ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात सध्या मराठा समाजाचे आंदोलन तीव्र होत असतांना आता अहिल्यानगर येथील संगमनेर येथे गुरुवारी रात्री शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच जिल्ह्यातील आज श्रीगोंदा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न झाला असल्याचे समोर आले आहे. यावेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. हे दोघेही संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

श्रीगोंदा येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवार यांना कांद्याच्या मुद्द्यावर बोलण्याची विनंती केली. मात्र, अजित पवारांनी यावर एक शब्दही बोलला नाही. अजित पवारांचे भाषण सुरू असताना काही कार्यकर्ते हातात कांद्याची माळ घेऊन आले होते. एका कार्यकर्त्याने हातातील माळ फिरवली आणि अजित पवारांच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच तेथील एकाने या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याला रोखले. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि तालुकाध्यक्ष नाना शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सध्या कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून त्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळेच कांद्याच्या दरावर सरकारने काहीतरी मार्ग काढावा, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांचे भाषण सुरू असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कांद्यावर बोलण्याची विनंती केली. मात्र, अजित पवारांनी त्यावर बोलणे टाळले. त्यानंतर अजित पवारांवर कांद्याची माळ भिरकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

दरम्यान, बुधवारी रात्री शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. गणेशोत्सवाच्या एका कार्यक्रमात अमोल खताळ उपस्थित होते. यावेळी एक तरुण त्यांना हात मिळवण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ गेला व हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच खताळ यांच्या जवळ असलेल्या सुरक्षारक्षकाने त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *