Home » जळगाव » प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचा निर्घृण खून; दोन सख्या भावांना अटक, मुक्ताईनगरात खळबळ!

प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचा निर्घृण खून; दोन सख्या भावांना अटक, मुक्ताईनगरात खळबळ!

मुक्ताईनगर : प्रतिनिधी

मुक्ताईनगर शहरात २८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (२३ नोव्हेंबर) उघडकीस आली. साखरपुडा झालेल्या तरुणीशी मृत तरुणाचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून दोन सख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या वातावरणात घडलेल्या या घटनेने शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत तरुणाचे नाव विशाल गणेशगीर गोसावी (वय २८, रा. जिजाऊनगर, मुक्ताईनगर) असे आहे. गेल्या दोन दिवसांपासून विशाल बेपत्ता होता. रविवारी सायंकाळी हॉटेल वृंदावनसमोरील प्लॉटिंग भागात स्थानिक नागरिकांना एका मोकळ्या जागेत त्याचा मृतदेह आढळला. देहावर चाकूने भोसकून केलेल्या हल्ल्याचे स्पष्ट चिन्हे दिसल्याने खुनाचा संशय बळावला. नागरिकांच्या माहितीवरून मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला.

पोलीस तपासात आरोपी म्हणून ऋषिकेश आत्माराम पवार (धनगर) आणि आकाश आत्माराम पवार (धनगर) या सख्या भावांना ताब्यात घेण्यात आले. आकाश पवारचा एका तरुणीसोबत साखरपुडा झाला असून त्या तरुणीचे विशाल गोसावीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आकाशला होता. या संशयातून दोघा भावांनी कट रचून विशालला दारू पाजली, त्यानंतर बोदवड रस्त्यावरील बंद पडलेल्या उद्यानात नेऊन चाकूने भोसकून हत्या केली, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा भावांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *