Home » जळगाव » जिल्ह्यात घरफोड्यांचा कहर; कासोदा–चोपड्यात ३.५९ लाखांची चोरी”

जिल्ह्यात घरफोड्यांचा कहर; कासोदा–चोपड्यात ३.५९ लाखांची चोरी”

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यात पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला आहे की काय, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. कारण, एकाच दिवशी कासोदा (ता. एरंडोल) आणि चोपडा येथे झालेल्या दोन घरफोड्यांत चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्या–चांदीच्या दागिन्यांवर हात साफ करत तब्बल ३ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील रामनगर भागात राहणारे निवृत्त कर्मचारी रमणलाल नथ्थु सोनार (वय ६९) हे पत्नीच्या गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेसाठी मुलाकडे नवसारी (गुजरात) येथे गेले असताना, १५ ते २१ जानेवारीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराची संधी साधली. कडी–कोयंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटातील लॉकर फोडण्यात आला. यामध्ये ७० हजार रुपये रोख, १० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र (७० हजार) आणि २५ हजारांचे चांदीचे देव असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून हवालदार राकेश खोडे तपास करीत आहेत.

दरम्यान, चोपडा शहरात घडलेल्या दुसऱ्या घटनेने खळबळ उडाली आहे. देशाच्या सीमेवर रक्षण करणारे BSF जवान देविदास बारीकराव पाटील (वय ४४) यांच्या ओमनगर येथील घरासह साक्षीदारांच्या घरांचे कुलूप २१ जानेवारीच्या पहाटे तोडण्यात आले. चोरट्यांनी सोन्याची पोत, अंगठ्या, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ दिनेश पाटील करीत आहेत. एकाच दिवसात दोन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, रात्रीची गस्त वाढवावी व घरफोड्यांचा तातडीने छडा लावावा, अशी मागणी होत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *