सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना आता सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस आणि ट्रकची धडक झाली असून, बसच्या एका बाजूचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. बिदरहून पंढरपूरकडे येणाऱ्या बसला ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की बसचा एका बाजूचा भाग पूर्णपणे उघडा पडला. या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले असून यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अपघातातील सर्व प्रवाशांना सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू करण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु, पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर अनेक प्रवाशांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झाला नाही.



