Home » राष्ट्रीय » पुलावरून बस कोसळली : ५ गंभीर तर २० किरकोळ जखमी

पुलावरून बस कोसळली : ५ गंभीर तर २० किरकोळ जखमी

सांगली : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच सांगली जिल्ह्यातील इटकरे येथे पुणे- बंगळुरु आशियाई महामार्गावर तांदुळवाडी जवळ गुरव पुलावरून एसटी बस क्रमांक MH १४ B T४२०३ खाली कोसळली. या अपघातात ५ प्रवासी गंभीर जखमी तर २० जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी १०:३० च्या दरम्यान घडला. अपघातानंतर जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, दहिवडी डेपोची बस ज्योतिबाकडे निघाली होती. तांदुळवाडीजवळ ती पुलावरून २५ ते ३० फूट खाली कोसळली. बस तोंडावर खोचल्यामुळे बहुतांश प्रवाशांच्या तोंडाला मार लागला आहे. तसेच ड्रायव्हर वाय. डी. मोकर गंभीर जखमी झाले असून त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल व वाहक माधुरी खरात यांना प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर येथे उपचार सुरु आहे. प्रवाशांना शासकीय व विविध खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. गाडी पुलावरून कोसळल्यामुळे गाडीची पुढील चाके तुटून पडली आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, इस्लामपूर डेपोचे मॅनेजर दिलीप ठोंबरे, नंदकुमार जाधव, मिलिंद कुंभार, रोहित पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक विक्रम पाटील करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *