जळगाव : प्रतिनिधी
जळगाव पोलिस दलाच्या वेल्फेअर विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावर पेट्रोल विक्रीतून मिळणारी रोकड सांभाळण्याची जबाबदारी उपनिरीक्षक वाल्मिक मधुकर वाघ (वय ५७, रा. साईनगर, निमखेडी) यांच्याकडे दिली आहे. परंतू गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी ती कोट्यावधी रुपयांची रोकड बँकेत भरलेली नाही. तर आता वाल्मिक वाघ हेच गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाले असून याप्रकरणी तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलिस दलाच्या वेल्फेअर विभागामार्फत जिल्हा पेठ परिसरात दक्षता पेट्रोलपंप चालविला जातो. याठिकाणी पेट्रोल विक्रीतून जमा झालेली रोकड ही दररोज हिशोब करुन पोलीस दलाच्या वेल्फेअर विभागाच्या बँक खात्यात जमा करावी लागते. यासाठी या विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे व्यवहार संभाळण्याची जबाबदारी दिली जाते. त्यानुसार सध्या उपनिरीक्षक वाल्मीक वाघ यांच्याकडे दररोजची रक्कम हाताळण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. जमा झालेली रक्कम बँक खात्यात जमा करणे आवश्यक असताना वाघ यांनी दोन ते तीन महिन्यांपासून रक्कम खात्यात जमा केलीच नाही. एवढ्या दिवसात मोठी रक्कम जमा झाल्याचा अंदाज असून आता दि. ११ फेब्रुवारीपासून वाघ बेपत्ता झाले आहेत.
उपनिरीक्षक वाल्मिक वाघ हे दि. ११ फेब्रुवारी रोजी दुचाकीने घरातून निघून गेल्याची तक्रार त्यांच्या मुलाने तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. घरातून जाण्यापूर्वी त्यांनी आपण घरातून जात असल्याचे मुलाला कळविले होते. मुलाने तात्काळ घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोलपंपावरील रक्कम बँकेत भरलेली नसल्याचे समोर आले आहे. पेट्रोल पंपावरील किती रक्कम वाघ यांच्याकडे होती, हे स्पष्ट नसले तरी हा आकडा कोट्यवधींचा असल्याचे सांगितले जात आहे. ही रोकड नेमकी रक्कम किती आहे, याची माहिती घेण्यासाठी लेखापरीक्षण करण्यात येत असून त्यानंतर रोकडचा आकडा स्पष्ट होईल.



