जामनेर : प्रतीनिधी
बसस्थानकावर शाळा, महाविद्यालय सुटल्यानंतर होणारी गर्दी, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या प्रकारांमुळे विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना दिसून येत आहे. सोमवारी दुपारी झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर या विषयावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

बसस्थानकात पोलिस मदत कक्ष असला तरी या ठिकाणी पोलिस अभावानेच दिसून येतात. परिणामी गुंड प्रवृत्तीच्या मुलांना रोखणारा कोणीही नसल्याने असे प्रकार वाढतच आहेत. शहरात ६ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, ४ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक ३ महाविद्यालये असून येथे शिक्षणासाठी हजारो विद्यार्थी बाहेरगावांहून येतात. शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या वेळेनंतर बसस्थानकावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. फलाटावर एस.टी लागण्यापूर्वी जागा पकडण्यासाठी जीव धोक्यात घालून एस.टी. मागे पळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातूनच सोमवारी विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. त्यात विद्यार्थ्यांसोबतच बाहेरील युवकांचाही समावेश असल्याचे दिसून आले. आवारात होत असलेल्या हाणामारीनंतर ही गर्दी रस्त्यावरुन धावू लागली. काहींनी ही माहिती पोलिसांना देऊनही पोलिस पोहोचले नसल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
गेल्यावर्षी एस.टी.त चढणाऱ्या महिला प्रवाशांच्या पर्समधील दागिने व रोकड लांबविण्याच्या घटना वाढल्याने स्थानकावर कायमस्वरूपी पोलिसाची नियुक्ती करण्यात आली होती. दुपारी ४ ते सायंकाळी ७ या कालावधीत प्रवाशांची संख्या व एस.टी.ची संख्या जास्त असल्याने उपलब्ध फलाटांची संख्या कमी पडते.



