मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांना या अधिवेशनात आज राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पीएफ प्रश्नावरून विधीमंडळात अनिल परब आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची आणि ग्रॅच्युइटीची रक्कम जमा करणे बाकी असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत मान्य केली. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रताप सरनाईक यांना घेरण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या पैशांवर डल्ला मारला जातोय, या लोकांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी अनिल परब यांनी केली.

प्रताप सरनाईक म्हणाले की, मध्यंतरी एसटी कामगारांचा संप झाला. तरीदेखील आम्ही कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली आहे. दुसऱ्या बाजूला भविष्य निर्वाह निधीसंदर्भात आमच्याकडे एकही तक्रार आलेली नाही. त्याचबरोबर भविष्यात अशा प्रकारे कुठल्याही निधीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च केली जाणार नाही. यावर कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे असे कुठेही वापरता येत नाहीत. हा फौजदारी गुन्हा आहे. ज्यांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे इतरत्र व पगारावर वापरले असतील त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. तसेच कर्मचाऱ्यांचे पैसे तात्काळ जमा करा, अशी विनंतीही केली.
अनिल परब यांच्या मागणीवर उत्तर देताना महामंडळाची 64 कोटी रुपयांची मासिक तूट आहे. तसेच शासनाकडून आम्हाला 582 कोटी रुपये येणे बाकी आहे. मानव विकास योजनेचे 268 कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यामुळेच आज ही स्थिती निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. परंतु, मी सर्वांना आश्वस्त करतो की कर्मचाऱ्यांच्या पीएफवरील व्याजाच्या रक्कमेचे नुकसान झालेले नाही. त्यांचे व्याज जमा केले जात आहे. कोणाचेही नुकसान होणार नाही. एकाही कर्मचाऱ्याचा भविष्य निर्वाह निधी इतरत्र कुठेही खर्च झालेला नाही. परंतु, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उत्तरानंतर अनिल परब आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.



