Home » राष्ट्रीय » बाबासाहेबांच्या उल्लेखावरून रणकंदन; वडेट्टीवारांचा गिरीश महाजनांवर घणाघाती हल्लाबोल

बाबासाहेबांच्या उल्लेखावरून रणकंदन; वडेट्टीवारांचा गिरीश महाजनांवर घणाघाती हल्लाबोल

नाशिक : वृत्तसंस्था

नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने राज्यभरात तीव्र राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेवरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गिरीश महाजन आणि सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

या कार्यक्रमादरम्यान भाषण सुरू असतानाच उपस्थित असलेल्या महिला वन अधिकारी माधवी जाधव यांनी थेट उभे राहून आक्षेप घेतला. “संविधान निर्मात्यांचे नाव तुम्ही कसे विसरलात?” असा रोखठोक सवाल त्यांनी भर कार्यक्रमात विचारल्याने काही काळ कार्यक्रमस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचे पडसाद आता राजकीय वर्तुळाबरोबरच सामाजिक स्तरावरही उमटू लागले आहेत.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार यांनी सडेतोड शब्दांत टीका केली. “ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याची लाज वाटते, त्यांना या देशात राहण्याचा आणि सत्तेच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. संविधान निर्मितीच्या काळात बाबासाहेबांना विरोध करणारीच मानसिकता आजही सत्तेत असल्याचा आरोप त्यांनी केला. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, “या सरकारचा कारभार लोकशाही मार्गाने चालतो की हुकूमशाही पद्धतीने, याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल. ज्यांना संविधानावर विश्वास नाही, अशांनी सत्तेत राहणे लोकशाहीसाठी घातक आहे.” या घटनेमुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले असून, या वादावर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *