जळगाव : प्रतिनिधी
ऑनलाईन टास्कमधून झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून शहरातील एका नागरिकाची ३ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना ६ नोव्हेंबर, गुरुवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश सोनार (रा.ज्ञानदेवनगर, वय ४५) हे शहरातील एका कॉलेजमध्ये लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ऑक्टोबर महिन्याच्या ५ तारखेला ‘टेलिग्राम’ या सोशल मीडिया अॅपवर एक संदेश आला. व्हिडिओ आणि फोटो लाईक केल्यास प्रत्येक लाईकवर १०० रुपये मिळतील, असे आमिष त्यात दाखवण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनार यांनी सुरुवातीचे काम पूर्ण केले असता, त्यांना ६६० रुपये मिळाले. यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांना बीटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवण्याचा ‘इकॉनॉमी टास्क’ पूर्ण करण्यास सांगण्यात आले. यासाठी त्यातही त्यांना काही प्रमाणात नफा झाल्याचा संदेश आला. नफा खरा वाटल्यामुळे, त्यांना मोठ्या गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करण्यात आले. २८ हजार रुपये भरल्यास ४२ हजार रुपये मिळतील असे सांगितले गेले. यासाठी सोनार यांनी त्यांच्या कडील बँकांच्या ‘क्रेडिट कार्ड’चा वापर करून वेगवेगळ्या तारखांना एकूण ३ लाख ६० हजार रुपये विविध बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले. ८ ऑक्टोबरला जेव्हा त्यांनी आपले ‘मिन्ट’ खाते तपासले, तेव्हा त्यात पैसे वाढण्याऐवजी दीड लाख रुपयांचा तोटा दाखवत होता. याबद्दल विचारणा केली असता, ‘डेटा रिपेअर’ करण्यासाठी आणखी दीड लाख रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनार यांनी तत्काळ शनिपेठ पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली आहे
आधार कार्डचा गैरवापर करून ‘मनी लाँड्रिंग’ आणि दहशतवाद्यांना पैसा पुरवण्याच्या पुरवण्याच खोट्या आरोपाखाली मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचा बनाव करून, अज्ञात सायबर गुन्हेगारांनी यावल तालुक्यातील एका वृद्ध शेतकऱ्याची ९ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार १ नोव्हेंबर रोजी समोर आला आहे. यावल तालुक्यातील बामणोद येथील ६७ वर्षीय वृद्धाने सायबर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. ३० ऑक्टोबर रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. बोलणाऱ्या व्यक्तीने आपण मुंबई क्राईम बॅचमधून बोलत असल्याचे सांगून, त्यांच्या आधार कार्डावर कॅनरा बँकेत खाते उघडून वीस कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे सांगितले. ३१ ऑक्टोबर रोजी, व्हॉटसअॅपवर व्हिडिओ कॉल आला. यामध्ये एक व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात, पाठीमागे मुंबई पोलिसांचा लोगो दाखवत होता. ‘तुमच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे,’ असे धमकावले.
दूर येणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी त्यांची आधार कार्ड, बँक पासबुक आणि मालमत्तेची माहिती घेतली. ‘तुम्ही निर्दोष सिद्ध झाल्यास पैसे परत मिळतील,’ असे सांगून आरटीजीएसद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावावर एका ‘सिटी युनियन बँके’च्या खात्यात ९ लाख ५० हजार रुपये भरण्यास भाग पाडले. या धमक्यांमुळे घाबरून वृद्धाने तात्काळ बँकेत जाऊन ही मोठी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली. वारंवार फोन येऊ लागल्याने संशय आल्यावर त्यांनी मुलाला हा प्रकार सांगितला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी १ नोव्हेंबर रोजी सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



