जळगाव : प्रतिनिधी
कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेला कर वेळेवर शासनाकडे जमा करणे ही प्रत्येक कंपनीची कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र, जळगाव येथील एका कर्मचाऱ्याने अशा गंभीर प्रकाराची तक्रार संबंधित विभागाकडे दाखल केली आहे. पुणे येथील बाणेर परिसरातील एका कंपनीने कर्मचाऱ्याच्या पगारातून TDS कपात करून तो शासनाकडे न भरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पगारातून एकूण 29,895 एवढी TDS रक्कम मार्च 2024 ते मार्च 2025 या कालावधीत कंपनीने कपात केली. मात्र, त्यांनी Form 26AS आणि AIS तपासले असता, संबंधित TDS रक्कम आयकर खात्याकडे जमा झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कंपनीने उत्पन्न कर नियमांचे उल्लंघन केल्याचा गंभीर संशय निर्माण झाला आहे. तक्रारदार यांनी आपल्या लेखी तक्रारीत नमूद केले की, “कंपनीने पगारातून कर कपात करून तो शासनाकडे जमा केला नसल्याने माझे आर्थिक नुकसान तर झालेच आहे, शिवाय भविष्यात करसंबंधी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.”
हा प्रकार प्रकाशात आल्यानंतर कंपनीविषयी संबंधित विभागाकडून योग्य ती चौकशी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. TDS कपात करून जमा न करणे हे आयकर अधिनियमांतर्गत दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये कंपनीवर आर्थिक दंड, व्याज तसेच फौजदारी कारवाईची शक्यता असते.
तक्रारदारांनी संबंधित विभागास विनंती केली आहे की, या प्रकाराची चौकशी करून कंपनीविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात यावी. या प्रकरणामुळे MDN Sales Force Private Limited कंपनीच्या कारभाराविषयी कर्मचारीवर्गात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, कंपनीकडून या आरोपांबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
‘त्या’ कंपनीच्या नावानिशी व तक्रारी निशी सविस्तर बातमी लवकरच !



