मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याचे चर्चा सुरू आहेत. मात्र मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शविल्याचे याआधी दिसून आले होते. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलेला असताना वडेट्टीवार यांनी केलेल्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
“आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आता तरी कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही, हे स्पष्ट आहे. मुंबई महापालिकेची तिजोरी खाली झाली आहे. मुंबईत भ्रष्टाचाराची प्रकरणे खूप आहेत, खिरापत वाटली जातेयं. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आवश्यक प्रश्न घेऊन निवडणुकीला समोरं जाऊ,” असं विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. मुंबईत काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पक्षाच्या हायकमांडबरोबर चर्चा झाल्यानंतरच पक्षाच्या स्थानिक नेत्यांना त्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे आणि आमच्या लोकांनी देखील तेच ठरवलं असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे, नाशिकमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यात नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार असल्याचे समोर आले आहे.



