जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा अडीच कोटी रुपयांचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जालना पोलिस अधीक्षकांना जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तत्पर कारवाई करत बीड जिल्ह्यातून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेले संशयित म्हणजे दादा गरुड आणि अमोल खुणे हे असून, अमोल खुणे हा जरांगे पाटलांचा पूर्वीचा सहकारी असल्याचे समोर आले आहे.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बीड शहरात काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी गुप्त बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अडीच कोटी रुपयांची डील ठरल्याची चर्चा आहे. तक्रार मिळताच पोलिसांनी मध्यरात्री छापा मारून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे; मात्र पोलिसांनी अद्याप अधिकृत पुष्टी दिलेली नाही.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः रात्री उशिरा जालना पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी तातडीने कारवाईची मागणी केली. जरांगे पाटील म्हणाले, “मराठा आरक्षण आंदोलनाला कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण आम्ही मागे हटणार नाही. आमच्या जीवावर बेतले तरी समाजासाठी लढत राहू.”
या घटनेनंतर पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ केली असून, अतिरिक्त पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. राज्यभर या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सुरक्षेतील त्रुटींवर सरकारला धारेवर धरले असून, सरकारने “या कटामागील दोषींना कठोर शिक्षा होईल” असा विश्वास व्यक्त केला आहे.
हा प्रकार केवळ एका नेत्यावरचा हल्ला नसून, राज्यातील सामाजिक चळवळींना हादरवून टाकणारा आहे. पोलिस तपासात आणखी काही मोठे राजकीय खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



