Home » ताज्या » महा-युतीत तडे? २ डिसेंबरवरून शिवसेना–भाजप आमनेसामने !

महा-युतीत तडे? २ डिसेंबरवरून शिवसेना–भाजप आमनेसामने !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी शिवसेना व भाजपमधील राजकीय कटूता वाढल्याचे चित्र आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्याला कोणत्याही स्थितीत 2 डिसेंबरपर्यंत महायुती टिकवायची आहे असे विधान केल्यानंतर आता मंत्री गणेश नाईक यांनीही शिवसेनाला ढकलण्यासंबंधीचे विधान केले आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीत 2 डिसेंबरनंतर फूट पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी बुधवारी भाजपचे मालवण स्थित पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या घरी धाड टाकली होती. त्यात त्यांच्या हाती पैशाची थैली लागली होती. हा पैसा भाजपने मतदारांना वाटण्यासाठी आणल्याचा आरोप त्यांनी केला होता. पत्रकारांनी याविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना छेडले असता त्यांनी आपल्याला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे असे नमूद करत त्यावर भाष्य करणे टाळले. मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. त्यानंतर मी नीलेश राणे यांना उत्तर देईन. मी आता त्यावर काहीही बोलणार नाही. नंतर बोलेन. पण नीलेश राणे जे बोलत आहेत ते खोटे आहे, असे ते म्हणाले.

त्यांच्या या विधानानंतर सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मित्रपक्षांना एकमेकांविषयी बोलताना तारतम्य बाळगण्याचा सल्ला दिला. मित्र पक्षांनी एकमेकांविषयी बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे. एकमेकांविषयीची आचारसंहिता पाळली पाहिजे. आमची केंद्रात व राज्यातही युती आहे. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच प्रचारात एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका न करण्याचा सल्ला दिला आहे. आत्ता रवींद्र चव्हाण काय म्हणाले हे मला माहिती नाही. पण ते असे बोलले असतील तर पुढेही युती टिकवायची आहे का? असे ते म्हणाले.

भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनीही या वादावर सूचक विधान केले आहे. ते म्हणाले, रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते बोलण्याच्या ओखात चुकून बोलले असतील. त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आम्हाला राज्यातील जनतेचा विकास करायचा आहे. जनतेची कामे करताना भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. गाडीत बसताना अडचण झाली तरी आम्ही अॅडजेस्ट करू. पण उद्या तुम्ही आम्हाला ढकलणार असाल तर आम्हीही पुढे कोण कुणाला ढकलते ते पाहू, असे ते म्हणालेत. गणेश नाईक यांच्या या विधानामु्ळे महायुतीत सर्वकाही ठिकठाक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *