Home » राष्ट्रीय » ‘दाल में कुछ तो काला लगता है’ ; अमोल मिटकरींच्या सवालांना विजय वडेट्टीवारांची दुजोरा !

‘दाल में कुछ तो काला लगता है’ ; अमोल मिटकरींच्या सवालांना विजय वडेट्टीवारांची दुजोरा !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यभरात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या विमान दुर्घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करत गंभीर सवाल उपस्थित केल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. “दाल में कुछ तो काला लगता है,” असे स्पष्ट शब्दांत सांगत या संपूर्ण प्रकरणातील सत्य बाहेर येणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांचा 100 टक्के घात झाल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हा तपासाचा विषय असून केवळ काही नेत्यांनाच नव्हे, तर महाराष्ट्रातील सुमारे 80 टक्के लोक या घटनेबाबत संशय व्यक्त करत आहेत. वडेट्टीवार म्हणाले, “वेळेवर पायलट का बदलण्यात आला, हा मोठा प्रश्न आहे. ज्या पायलटचे नाव सुरुवातीला समोर आले होते, तो आज जिवंत आहे, कारण तो वेळेवर पोहोचू शकला नाही. एक नक्की आहे की ‘दाल में कुछ तो काला लगता है’. याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. तपासातून जे काही सत्य असेल ते जनतेसमोर आलेच पाहिजे.”

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी विलगीकरणाच्या मुद्द्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाला याबाबत का सांगितले नाही? किंवा भाजपला सांगितल्याशिवाय पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का? हा पक्ष भाजप सांगेल तसाच चालतो का?” असे सवाल त्यांनी केले. दोन पक्ष एकत्र येऊ नयेत म्हणून कुठेतरी कट शिजला आणि त्यातूनच ही ठिणगी पडली, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

याच वेळी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या शपथविधीवरही वडेट्टीवार यांनी अप्रत्यक्ष टीका केली. “आपल्या संस्कृतीला आणि हिंदू परंपरेला धरून हा शपथविधी झाला, असे अनेकांना वाटत नाही. हा निर्णय एवढ्या घाईने का घेण्यात आला, असा प्रश्न लोक विचारत आहेत,” असे ते म्हणाले. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या या प्रश्नांमुळे आणि नेत्यांच्या प्रतिक्रियांमुळे आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *