भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील भरवस्तीत चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने घरफोडी करत रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची धाडसी घटना उघडकीस आली आहे. आठ दिवस घर बंद असल्याचा फायदा घेत ही चोरी करण्यात आली. जमीला रऊफ कुरेशी या ६ तारखेला आईची प्रकृती बिघडल्याने बडनेरा येथे गेल्या होत्या. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्या तेथेच थांबल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी त्यांनी मुलगी व जावयास घराची पाहणी करण्यास सांगितले. त्यांनी मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता दोन्ही खोल्यांचे कडी-कोयंडे तुटलेल्या अवस्थेत दिसून आले.

मिळालेल्या माहितीनुसार, एका खोलीतील पेटी फोडलेली होती, तर दुसऱ्या खोलीतील कपाटांचे कुलूप तोडण्यात आले होते. विशेष म्हणजे एका कपाटाचे कुलूप गॅस कटरने कापल्याचे स्पष्ट दिसून आले. घरातील पलंग, बॅगा, पिशव्या तसेच तिजोरी अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आल्याने चोरट्यांनी सखोल शोधाशोध केल्याचे निष्पन्न झाले. या घरफोडीत अंदाजे ९५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेली आहे. तसेच एका गल्ल्यातील रक्कम नेमकी किती होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाऊण ते एक किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि तीन ते चार तोळे सोन्याचे दागिनेही चोरट्यांनी लंपास केले आहेत.
या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



