Home » जळगाव » मुलीचे परस्पर लग्न : जळगावच्या वधू व मध्यस्थांविरुध्द गुन्हा दाखल !

मुलीचे परस्पर लग्न : जळगावच्या वधू व मध्यस्थांविरुध्द गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी

येथील तरुणीला नोकरीच्या आमिषाने नाशिकला नेत काही जणांनी तिचे कोल्हापूरच्या मुलाशी परस्पर लग्न लावून देण्याच्या प्रकरणात आता वर मुलाने जळगावची वधू व मध्यस्थांविरुध्द तक्रार दिली आहे. त्यावरून मुलीसह पाच जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. आशिष सदाशिव गंगाधरे (३०, रा. थेरगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, आशिषच्या तक्रारीत म्हटले आहे की, वधू, मीनाक्षी जैन, सुजाता ठाकूर, अक्षय ठाकूर व धनश्री या मंडळींनी आपल्याला मुलगी दाखविली. आपण त्यांना एक लाख ९५ हजार रुपये दिले आणि ३ फेब्रुवारी रोजी लग्न झाले. त्यानंतर ही मुलगी एप्रिल २०२५मध्ये जळगावात आल्यापासून घरी परतली नाही, शिवाय तिने पैसे, दागिनेही परत दिले नाही. या मुलीचा मोबाइल बंद असल्याने आशिष गंगाधरे व आप्पासाहेब गंगाधरे यांनी २४ जून रोजी जळगावात येत मुलीच्या आईकडे विचारणा केली. त्यावेळी ज्यांनी लग्न लावून दिले, त्यांना विचारा, असे तिच्या आईने सांगितले. यामुळे आशिष गंगाधरे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मुलगी, मीनाक्षी जैन, सुजाता ठाकूर, अक्षय ठाकूर व धनश्री यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाहासाठी दिलेले पैसे व दागिने परत मिळण्यासाठी मुलाकडून धमक्या दिल्या जात असल्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. सचिन दादाराव अडकमोल, मनीषा उर्फ मीनाक्षी दिनेश जैन (दोन्ही रा. जळगाव), मुलीचा पती आशिष सदाशिव गंगाधरे व त्याचा चुलत भाऊ आप्पासाहेब बजरंग गंगाधरे (दोन्ही रा. थेरगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *