जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहर महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची आज अधिकृतपणे बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

अलीकडेच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला दणदणीत यश मिळाले होते. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ४६, शिवसेनेला २२, राष्ट्रवादी काँग्रेसला १, शिवसेना (उबाठा) गटाला ५ जागा मिळाल्या होत्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. महापौरपदासाठी भाजपकडून दीपमाला काळे आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून मनोज चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या विरोधात कोणताही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती.
आज झालेल्या विशेष सभेला महापालिका आयुक्त, उपायुक्त, अधिकारी वर्ग तसेच नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. महायुतीचे सर्व नगरसेवक भगवे फेटे परिधान करून सभागृहात दाखल झाले होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महायुतीचे ज्येष्ठ पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दीपमाला काळे यांच्या नावाची महापौरपदी तर मनोज चौधरी यांच्या नावाची उपमहापौरपदी घोषणा केली. यावेळी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. निवड जाहीर झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचा सत्कार केला. दरम्यान, निवड जाहीर होताच महापालिका आवारात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.


