मालेगाव : वृत्तसंस्था
राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी मालेगाव महापालिकेत नमाज पठणाच्या मुद्द्यावरून तीव्र टीका केली आहे. निवडणुकीपूर्वी काही पक्ष “जय भीम-जय मीम” म्हणतात; मात्र निवडणुकीनंतर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विसरतात, असा आरोप त्यांनी केला. तसेच, महापालिकेत नमाज पठणास परवानगी संविधानाच्या कुठल्या पानावर आहे, हे दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

राणे म्हणाले की, लोकप्रतिनिधी विकासासाठी निवडून आले आहेत की धर्मवाढीसाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “मनपामध्ये विकासकामे करण्याऐवजी धार्मिक कार्यक्रम घेतले जात असतील, तर तो जिहाद नाही का? मशिदी बंद पडल्या आहेत का? मग मनपामध्ये नमाज का?” असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच, “जर आम्ही हिंदू राष्ट्राच्या नावाखाली प्रत्येक मनपामध्ये भगवद्गीता वाचन सुरू केले, तर त्यावर आक्षेप घेतला जाईल. तुम्ही केले तर चालते आणि आम्ही केले तर हिंदू-मुस्लीम वाद म्हणायचे, हे दुहेरी निकष आहेत,” असेही ते म्हणाले.
याशिवाय, राणे यांनी मदरशांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काही ठिकाणी लहान मुलांवर अत्याचाराच्या घटना समोर आल्याचा उल्लेख करत त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. “मदरसे कशासाठी हवेत? मशिदीत कुराण शिकवता येते. वेगळे अड्डे कशाला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील सर्व मदरसे बंद करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राणे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांकडून या विधानांवर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



