जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बिलवाडी येथे दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत एकनाथ निंबा महाजन (गोपाळ) (५५, रा. बिलवाडी) यांचा मृत्यू झाल्यानंतर गोपाळ कुटुंबीय व नातेवाईक संतप्त झाले. रुग्णालयात दोन्हीही कुटुंब एवढे आक्रमक झाले की, ते उपचारासाठी आल्यानंतर सर्व जखमी एकमेकांशी भिडले. यामुळे रुग्णालयात दुपारपासून संध्याकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. या घटनेत मयताचे दोन्ही मुले, पत्नीसह दोन्ही गटांतील १२ जण जखमी झाले आहे.

मयताची पुतणसून रेखाबाई रवींद्र गोपाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री त्यांचे सासरे रामदास गोपाळ हे थुंकले होते. त्यावरून गावातील पाटील कुटुंबातील एकाने वाद घातला. रात्री हा वाद मिटला होता. रविवारी दुपारी एकनाथ महाजन हे बकऱ्या चारून घरी येत असताना, त्यांच्याशी पाटील कुटुंबाने वाद घातला. त्यानंतर वाद वाढत जाऊन पाटील व गोपाळ कुटुंब एकमेकांशी भिडले. बांधकाम साहित्य, लाकडी दांड्याचा वापर करीत हाणामारी झाली. त्यात एकनाथ महाजन यांचा मृत्यू झाला. पाटील व गोपाळ कुटुंबामध्ये १० वर्षांपासून वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, वादाला राजकीय किनारही असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातून पुन्हा वाद उफाळला व एका जणाचा जीव गेला.
या हाणामारीच्या घटनेत दोन्ही कुटुंबांमधील १२ जण जखमी झाले आहेत. त्यात किरण देवीदास पाटील (२८), मीराबाई सुभाष पाटील (४८), ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील (४०), दीपक ज्ञानेश्वर पाटील (२३), संगीता रोहिदास पाटील (४०), कमलेश प्रमोद पाटील (२६), जनाबाई एकनाथ गोपाळ (५५), ज्ञानेश्वर एकनाथ गोपाळ (३५), समाधान हिलाल गोपाळ (३५), गणेश एकनाथ गोपाळ (२७), गौरव अर्जुन गोपाळ (३१), भीमराव एकनाथ गोपाळ यांचा समावेश आहे



