Home » राष्ट्रीय » ‘मराठी माणसाला दुय्यम समजू नका’; गुलाबराव पाटलांच्या विधानावर मनसेचा संताप !

‘मराठी माणसाला दुय्यम समजू नका’; गुलाबराव पाटलांच्या विधानावर मनसेचा संताप !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर बिहारी तरुणांचे कौतुक करत मराठी तरुणांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. मराठी तरुणांमध्ये काम करण्याची वृत्तीच उरली नाही, या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र आक्रमक भूमिका घेतली असून, मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी गुलाबराव पाटील यांना खडेबोल सुनावले आहेत.

अव्यंकर यांनी म्हटले की, “ज्या मराठी माणसाच्या जीवावर तुम्ही मोठे झालात, त्याच मराठी माणसाला सत्तेच्या लाचारीसाठी दुय्यम समजू नका.” गुलाबराव पाटील गेली अनेक वर्षे मराठी माणसाच्या जीवावर राजकारण करत असल्याचा आरोप करत त्यांनी थेट शिवसेना फुटीच्या घटनेचा संदर्भ देत बोचरा टोला लगावला. “तुम्ही आज सत्तेत आहात, पण तुमच्या ४० लोकांचे कर्तृत्व महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेले आहे,” असेही ते म्हणाले.

या प्रकरणात अविनाश अभ्यंकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लक्ष वेधले असून, त्यांनी योग्यवेळी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. “सत्तेचा अमरपट्टा कुणीही घेऊन आलेला नाही. सत्तेत असताना जर मराठी माणसाला दुय्यम दर्जा देण्याचा प्रयत्न केला, किंवा मराठी तरुण काम करत नाहीत, असे विधान केले, तर याचे परिणाम महाराष्ट्रातील जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे मराठी अस्मिता आणि रोजगाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून, येत्या काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?

मंत्री गुलाबराव पाटील शनिवारी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना म्हणाले, आपल्या तरुणांकडे आता नोकरी करण्याची मानसिकता उरली नाही. बिहारी माणूस येथे येऊन आपले पोट भरतो. पण आपण बिहारींवर टीका करतो. कशाला टीका करता? आपल्या तरुणांमध्ये काम करण्याची वृत्तीच उरली नाही हे सत्य आहे. तरुणांना माझ्या बोलण्याचा राग आला तर आला. आता 4 वर्षांनी निवडणुका आहेत. तेव्हा पाहू, असे ते हसत म्हणाले होते. आता त्यांच्या या विधानावर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी पलटवार केलाय. दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावरही संतापाची लाट असून, ऐन राजकीय घडामोडींच्या काळात या ‘बिहारी’ प्रेमामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *