मुंबई | प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता निवडणूक लढवण्याचा ठाम सल्ला दिला आहे. “महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला विविध ऑफर्स दिल्या जातील, पैशांचेही आमिष दाखवले जाईल. मात्र त्याला बळी पडू नका. आपल्याला मुंबई वाचवायची आहे आणि ती वाचवण्याची ही शेवटची संधी आहे,” असे स्पष्ट शब्दांत राज ठाकरे म्हणाले.

मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी आज मनसेच्या ५३ उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उमेदवारांचे औक्षण केले. त्यानंतर राज ठाकरे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन करताना मुंबई महापालिकेचा ‘किल्ला’ कोणत्याही दबावाशिवाय आणि प्रामाणिकपणे लढवण्याचे आवाहन केले.
राज ठाकरे म्हणाले, “मुंबई ही मराठी माणसाची आहे. तिचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने ठामपणे उभे राहिले पाहिजे. मलाही याआधी अनेक ऑफर्स आल्या होत्या, पण मी त्या झुगारून लावल्या. तुम्हीही तसेच करा.” मतदानाच्या दिवशी बोगस मतदान होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे आवाहनही राज ठाकरे यांनी केले. “सत्ताधारी पक्षांकडून बोगस मतदानाचा प्रयत्न होऊ शकतो. प्रत्येक मतदान केंद्रावर आपली दहा माणसे तैनात ठेवा. संशयास्पद मतदार आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवा आणि कायदेशीर मार्गाने कारवाई करा,” असे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी युती केली असून मनसे ५३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. येत्या ४ जानेवारी रोजी ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा जाहीर होणार असल्याची माहिती शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दिली. वचननामा जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मुंबईसह एमएमआर परिसरात संयुक्त सभा होणार असून, पूर्व व पश्चिम उपनगरांबरोबरच मीरा-भाईंदर, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नाशिक येथेही जोरदार सभा घेण्यात येणार आहेत. वचननाम्याच्या तयारीचे काम आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे करत असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.



