मुंबई : वृत्तसंस्था
दोन दिवसापासून मुंबई येथील मीरा रोड भागातील एका घटनेमुळे पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मीरा भाईंदर येथील एका व्यापाऱ्याला मराठी न बोलल्यामुळे मारहाण झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर ३ जुलै रोजी व्यापाऱ्यांनी मीरा भाईंदर बंद पुकारला होता. आता यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत थेट व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे.

३ जुलै रोजी मीरा भाईंदर येथील व्यापारी समुदायाने मारहाणीच्या घटनेला तीव्र विरोध दर्शविला आहे. “व्यापाऱ्यांच्या सुरक्षेची गॅरंटी कोण घेणार?” आणि “मनमानी गोंधळ सहन केला जाणार नाही” अशा घोषणा व्यापाऱ्यांनी रस्त्यावरून उतरुन मोर्चा काढला होता. यानंतर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्यापाऱ्यांना उद्देशन एक ट्वीट केले आहे.
“बेपारी आहात, बेपार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल, बाकी मेहता-बिहतानी चड्डीत राहायचं.” असे म्हणत त्यांनी थेट इशारा दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे हा वाद आता आणखीच चिघळणार असल्याचे बोलले जात आहे.
नेमकी घटना काय घडली?
घटना आहे १ जुलै २०२५ च्या दिवशीची. या दिवशी मीरा रोड येथील जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानात दुकानदार बाबूलाल खिमजी चौधरी वय ४८ वर्ष यांनी मराठीत बोलण्यास नकार दिल्याने मनसेच्या कार्यकर्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे व्यापारी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. ३ जुलै रोजी भाईंदरमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.



