Home » जळगाव » मनपाच्या दुर्लक्षामुळे सिंधी कॉलनीत घाणीचे साम्राज्य; नागरिकांमध्ये संताप

मनपाच्या दुर्लक्षामुळे सिंधी कॉलनीत घाणीचे साम्राज्य; नागरिकांमध्ये संताप

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील सिंधी कॉलनी परिसरासह नवीन जोशी कॉलनी आणि सम्राट कॉलनी भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कचरा संकलन पूर्णपणे ठप्प झाल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मनपाच्या आरोग्य विभागाकडून येणारी घंटागाडी वेळेवर न आल्याने रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि मोकळ्या जागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

या भागात नियमितपणे कचरा उचलला जात नसल्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली असून डास, माशा व किड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. “मनपा स्वच्छतेबाबत मोठमोठे दावे करत असते; मात्र प्रत्यक्षात आमच्या परिसरात मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयश येत आहे,” अशी तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. घंटागाडी येत नसल्याने नागरिकांना घरातील कचरा टाकण्यासाठी पर्यायच उरलेला नाही, त्यामुळे कचरा रस्त्यावर टाकला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या संपूर्ण प्रकाराकडे मनपाच्या आरोग्य विभागाने तात्काळ लक्ष देऊन नियमित कचरा संकलन सुरू करावे, साचलेला कचरा त्वरित उचलावा तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *