पुणे : वृत्तसंस्था
इराण-इस्रायल युद्धात आता अमेरिकेने उडी घेतल्याने संघर्षाची ही स्थिती बराच काळ अशीच राहण्याची चिन्हे आहेत. यामुळे जगभरातून खाद्यतेलाला मागणी वाढत असून, कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या दराने उसळी घेतली आहे. मार्केट यार्डमधील घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या तेलाचे दर किलोमागे तीन ते चार रुपयांनी तसेच पंधरा लिटर, किलोच्या डब्यामागे पन्नास ते साठ रुपयांनी वाढले आहेत.
युद्ध सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने आयात शुल्क १० टक्क्याने कमी केले होते. त्यामुळे खाद्यतेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र, इराण-इस्रायल युद्धामुळे खनिजतेलाच्या किमती बॅरलमागे सहा डॉलर्सनी वाढल्या आहेत. त्यामुळे सरकी, पाम आणि सूर्यफूल तेलाच्या दरांत वाढ झाली. सध्या तेलाची मागणी कमी आहे. आगामी सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यास भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नारळाचे उत्पादन घटल्याने गोटा खोबऱ्याच्या भावात मागील आठवड्यात घाऊक बाजारात किलोमागे २ ते ३ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे खोबरेल तेलाचे भाव तेजीत आहेत. २५ किलोच्या डब्याचा दर ६००० रुपयांवर पोहोचला आहे. दर उच्चांकी पातळीवर गेल्यामुळे सध्या बाजारात खोबरेल तेलाची आवक जवळपास थांबली आहे.
