नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली असताना, आयोगाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतातील 334 नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली असून, त्यात महाराष्ट्रातील 9 पक्षांचा समावेश आहे. हे पक्ष सहा वर्षांपासून कोणत्याही निवडणुकीत सहभागी झालेले नाहीत आणि त्यांचा अधिकृत पत्ता अस्तित्वात नसल्याचे आढळले आहे.
लोकप्रतिनिधी कायदा 1951 (कलम 29A) नुसार, नोंदणीनंतर पाच वर्षांच्या आत किमान एक निवडणूक लढवणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास, आणि पक्षाचा पत्ता अस्तित्वात नसेल किंवा आर्थिक हिशेब सादर न केल्यास आयोग त्या पक्षाची नोंदणी रद्द करू शकतो. रद्द झालेल्या पक्षांना निवडणूक चिन्ह, आयकर सवलत आणि प्रचारासाठी मिळणाऱ्या सुविधांपासूनही वंचित राहावे लागते. रद्द झालेल्या कोणत्याही पक्षाला 30 दिवसांच्या आत या निर्णयाविरोधात अपील करता येईल.
रद्द झालेल्या महाराष्ट्रातील पक्षांची यादी:
नवबहुजन समाजपरिवर्तन पार्टी
अवामी विकास पार्टी
भारतीय संग्राम परिषद
द लोक पार्टी ऑफ इंडिया
युवा शक्ती संघटना
बहुजन रयत पार्टी
नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी
इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया
पीपल्स गार्डियन
सध्या देशात 6 राष्ट्रीय पक्ष, 67 प्रादेशिक पक्ष आणि 2854 नोंदणीकृत पण मान्यता नसलेले पक्ष अस्तित्वात आहेत.
