मुंबई : वृत्तसंस्था
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या १९ डिसेंबरला देशात मोठा राजकीय भूकंप होऊन मराठी माणूस पंतप्रधान होईल, असा खळबळजनक दावा केला होता. हा दावा अमेरिकेतील कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित फाइल्सच्या प्रकाशनाशी जोडला होता. मात्र १९ डिसेंबर उलटून गेल्यानंतरही पंतप्रधानपदी कोणताही बदल न झाल्याने चव्हाण यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर २० डिसेंबर रोजी साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले. “मला ट्रोल केले जात असले तरी त्याची मला काहीही हरकत नाही. अमेरिकेत घडणाऱ्या घडामोडींमुळे पुढील काही दिवसांत भारतीय राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो, एवढेच मी म्हटले होते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
चव्हाण यांनी जेफ्री एपस्टीन प्रकरणावरून थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला. एपस्टीन मोठे सेक्स रॅकेट चालवत होता आणि त्याचा मृत्यू आत्महत्या की हत्या, हे अद्याप गूढच आहे, असे सांगत त्यांनी अमेरिकन संसदेच्या दबावामुळेच एपस्टीन फाइल्स जाहीर करण्यात आल्याचा दावा केला. “मोदी आणि एपस्टीन यांच्यातील कथित संबंधांवर सरकारने खुलासा करावा. फाइल्समध्ये केंद्रीय मंत्र्यांची नावे असल्याचे म्हटले जाते, मात्र सरकार ना खुलासा करते ना आरोप फेटाळते,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेतील जेफ्री एपस्टीनवर जगभरातील प्रभावशाली व्यक्तींना अल्पवयीन मुली पुरवल्याचे गंभीर आरोप आहेत. ‘Epstein Files Transparency Act’ अंतर्गत या प्रकरणाशी संबंधित हजारो कागदपत्रे, ई-मेल्स आणि छायाचित्रे १९ डिसेंबर २०२५ पर्यंत सार्वजनिक करण्याची मुदत होती. अमेरिकन न्याय विभागाने काही फाइल्स प्रसिद्ध केल्या असल्या तरी त्या पूर्णपणे अनरेडॅक्टेड नसल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात चव्हाण यांनी अमेरिकेतील स्टिंग ऑपरेशन, इस्रायली गुप्तहेर यांचा संदर्भ देत भारतात मोठी राजकीय उलथापालथ होईल, असे भाकीत केले होते. मात्र हे भाकीत प्रत्यक्षात न आल्याने त्यांच्यावर टीका आणि ट्रोलिंग वाढली आहे. तरीही, अमेरिकेतील घडामोडींचा भारतीय राजकारणावर परिणाम होऊ शकतो, या भूमिकेवर चव्हाण ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात नवी चर्चा आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे.



