Home » महाराष्ट्र » “टक्कल पडलं तरी मला शिकवतात : अजित पवारांची मिश्किल सभा गाजली”

“टक्कल पडलं तरी मला शिकवतात : अजित पवारांची मिश्किल सभा गाजली”

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वत्र प्रचारसभांची मालिका रंगली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रमुख अजित पवार यांनी सोमवारी खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी आपल्या खास मिश्किल शैलीत “माझे टक्कल पडलं तरी लोक मलाच शिकवतात” अशी कोटी करून उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

सभेदरम्यान स्थानिक पदाधिकारी बाबा राक्षे यांनी काही सांगण्यासाठी त्यांच्याजवळ येताच पवार म्हणाले, “हो बाबा हो… आता हा मला शिकवायला चाललाय. असे बोला, तसे बोला! माझे टक्कल पडलंय तरी लोक मला शिकवतात. बाबा लोकांचे सगळे ऐकावे लागते; आता कुठल्या बाबांचे ऐकायचे हे तुमच्या हाती आहे.” त्यांच्या या विनोदी टिपणीने सभागृहात हास्याची लाट पसरली. निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतदारांच्या मानसिकतेवर भाष्य करताना पवार म्हणाले, “मतदार मतदानाच्या आधीची रात्र जागून काढतात. घराबाहेर आवाज आला तरी ‘मी जागाच आहे, कोणाला मत द्यायचे ते ठरवत आहे’ असे म्हणतात. त्यामुळे उमेदवारांनी आजची रात्र डोळ्यात तेल घालून पाहावी.”

यावेळी त्यांनी स्वतःवर होणाऱ्या आरोपांनाही उत्तर दिले. “मी कामाचा माणूस आहे. प्रशासनावर माझी पकड आहे; पण मला विनाकारण 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जातो. प्रत्यक्षात मी एक रुपयांचाही मिंदा नाही. काम करताना कुणाकडून पैसे मागितले किंवा घेतले याचा एकही पुरावा दाखवा,” असे पवार यांनी स्पष्ट केले. राजगुरूनगरची ही सभा विनोद, मिश्किल शैली आणि आरोप-प्रत्यारोपांना दिलेल्या उत्तरांमुळे रंगली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *