Home » जळगाव » भुसावळ » दीपनगरात खळबळ : अधीक्षक अभियंत्याने घेतली लाच !

दीपनगरात खळबळ : अधीक्षक अभियंत्याने घेतली लाच !

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गेल्या काही महिन्यापासून लाचलुचपतच्या घटना घडत असताना आता भुसावळ येथील दीपनगर महावितरण कंपनीच्या कार्यालयात कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता भानुदास पुंडलिक लांडवंजारी (वय ५७, रा. नेहरुनगर, जळगाव) यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. तक्रारदाराचे मोठे विद्युत बिल दुरुस्त करून वीजपुरवठा कायम ठेवण्यासाठी लांडवंजारी यांनी ही लाच मागितली होती.

अभियंता लांडवंजारी यांच्या अखत्यारीत तक्रारदाराचे वीज बिल दुरुस्त करण्याचे काम होते. त्यांनी २ लाख ५९४ रुपये देयके दुरुस्त करण्याच्या मोबदल्यात बिलाच्या ५ टक्क्यांप्रमाणे लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने बुधवारी (१९ नोव्हेंबर) एसीबीकडे धाव घेतली. तक्रारीची सत्यता पडताळल्यानंतर, आज गुरुवारी (२० नोव्हेंबर) एसीबीने दीपनगर येथील महावितरणच्या कार्यालयात सापळा रचला. लांडवंजारी यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच, पथकाने त्यांना रंगेहात पकडून तत्काळ अटक केली.

पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वी केली. लांडवंजारी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ प्रमाणे भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *