छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, आज (दि. २० सप्टेंबर) दुपारी महायुती सरकारमधील भाजप नेते व मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर अज्ञात तरुणाने दगडफेक केल्याची खळबळजनक घटना घडली. ही घटना पुंडलिकनगर येथील त्यांच्या कार्यालयासमोर घडली असून, गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारास मंत्री अतुल सावे हे आपल्या पुंडलिकनगर येथील कार्यालयात उपस्थित असताना, बाहेर उभी असलेल्या त्यांच्या वाहनावर एका तरुणाने अचानक दगड फेकला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळ निर्माण झाला. घटनेनंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले व संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत हा तरुण मानसिक रुग्ण असल्याची माहिती पुढे आली असून, त्याला वैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा राजकीय व्यक्तींवरील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी समर्थकांकडून होत आहे.



