Home » जळगाव » फेसबुक ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ ठरली सापळा; अमळनेरच्या डॉक्टरांची १.६५ कोटींची क्रिप्टो फसवणूक

फेसबुक ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ ठरली सापळा; अमळनेरच्या डॉक्टरांची १.६५ कोटींची क्रिप्टो फसवणूक

अमळनेर : प्रतिनिधी

क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अमळनेर येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अनिल नथ्थू शिंदे (वय ७०) यांची तब्बल १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार २९ जानेवारी ते १९ फेब्रुवारीदरम्यान घडला. याप्रकरणी डॉ. शिंदे यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात झासी प्रवीण पाटील नामक महिलेसह तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी डॉ. शिंदे यांना Facebook वर झासी पाटील या नावाने ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली. ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये साधारण संवाद सुरू झाला. विश्वास संपादन केल्यानंतर संबंधित महिलेने ‘इंटरनॅशनल ट्रेडिंग’बाबत माहिती देत मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले. ९ फेब्रुवारी रोजी तिने पुन्हा संपर्क साधत क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीची संधी असल्याचे सांगितले. गुंतवणुकीसाठी लिंक पाठवून अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार डॉक्टरांनी टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम गुंतवली. अॅपवर त्यांच्या खात्यात गुंतवलेल्या १.६५ कोटी रुपयांवर तब्बल ३ कोटी २१ लाख ८७ हजार ७६६ रुपये नफा झाल्याचे दर्शविण्यात येत होते.

नफा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत विचारणा केली असता, कंपनीची २० टक्के ‘व्हेरिफिकेशन फी’ म्हणून ६५ लाख ३१ हजार २९४ रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. मात्र, इतकी अतिरिक्त रक्कम देणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी कळवून आधीची गुंतवणूक परत करण्याची विनंती केली. त्यावर उडवाउडवीची उत्तरे देत पैसे परत देण्यास नकार देण्यात आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. शिंदे यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी झासी पाटील व तिच्या अज्ञात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.

दरम्यान, विविध आमिषे दाखवून ऑनलाइन पद्धतीने कोट्यवधींची फसवणूक करण्याचा महिनाभरातील हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वी शेअर ट्रेडिंगची माहिती शोधताना एका व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये जोडलेल्या सेवानिवृत्त व्यक्तीची १ कोटी ३५ लाख ८५ हजार १८९ रुपयांची फसवणूक झाली होती. सायबर तज्ज्ञांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींच्या गुंतवणूक प्रस्तावांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. मोठ्या नफ्याचे आमिष, अनोळखी अॅप्स व ‘व्हेरिफिकेशन फी’च्या नावाखाली मागितली जाणारी अतिरिक्त रक्कम हे सायबर फसवणुकीचे प्रमुख संकेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *