मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेची अर्ज प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार या योजनेचा लाभ महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना थेट मिळणार आहे. यापूर्वी अर्जाची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने केली जात होती.

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या निर्णयाची माहिती दिली. अपघातात शेतकरी मृत्यूमुखी पडल्यास 2 लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांची मदत या योजनेत दिली जाते. आतापर्यंत अर्जासाठी शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रे सादर करावी लागत होती. कागदपत्रांतील त्रुटी आणि प्रक्रियेत होणारा विलंब टाळण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले.
महाडीबीटी पोर्टलवरून शेतकरी किंवा त्यांचे वारसदार घरबसल्या अर्ज भरू शकतील. अर्जाची सद्यस्थितीही पोर्टलवर पाहता येईल. कागदपत्रांत त्रुटी असल्यास त्याची माहिती थेट संबंधितांना मोबाइलवर पाठवली जाईल. त्यामुळे कार्यालयीन फेर्या टळणार आहेत.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय प्रस्तावांची तपासणी करेल आणि तहसीलदार अध्यक्ष असलेली समिती मंजुरी देईल. मंजूर अनुदानाची रक्कम थेट डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. या योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात 120 कोटी रुपयांची तरतूद असून, आजपर्यंत 4,359 शेतकऱ्यांना 88.19 कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिली.



