जळगाव : प्रतिनिधी
पॅथॉलीजी लॅबमधून बनावट रिपोर्ट तयार करुन तो शहरातील टायटन मल्टी स्पेशलीटी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट झाल्याचे दाखविले. त्यानंतर तरुणाच्या नावाने मेडीकल बिलाचा क्लेम कंपनीकडून मंजूर करुन घेत दिल्ली येथील विजय संतराम गुप्ता (वय २५, रा. तुघलकाबाद, नवीन दिल्ली) या तरुणाची जळगावात फसवणूक केली. ही घटना दि. २१ सप्टेंबर २०२४ मध्ये घडली. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन दिल्ली येथील तुघलकाबाद येथे विजय संतरात गुप्ता हा तरुण वास्तव्यास आहे. या तरुणाची न्यू. इंडिया पॉलीसी कॉ. लिमी. या कंपनीत मेडीकल इन्शुरन्स पॉलीसी आहे. दि. २१ सप्टेंबर २०२४ मध्ये हा तरुणाला शहरातील टायटन मल्टी स्पेशलीटी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट असल्याचे दाखविले. तसेच जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅब येथील रिपोर्ट असून त्याद्वारे तरुणाच्या नावाने न्यू इंडिया पॉलीसी कॉप लिमी कंपनीतून मेडीक्लेम मंजूर करुन घेत तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे.
तरुणाचे काढलेल्या मेडीक्लेमची मुदत संपल्यानंतर तो रिन्युअल करण्यासाठी गेला. त्यावेळी त्याने आजपर्यंत कोणत्याही मेडीक्लमेचा लाभ घेतलेला नसल्याने त्याने कंपनीकडे रिन्युअलमध्ये सूट मिळण्याची विनंती केली. यावेळी विजय गुप्ता यांस कंपनीकडून तुम्ही जळगावातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल होवून मेडीक्लेमचा लाभ घेतल्याचे सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दिल्ली येथील विजय गुप्ता हे एकदाही जळगावात आलेले नसतांना त्यांच्या नावाने लॅबमधून बनावट रिपोर्ट तयार करुन अॅडमीट झाल्याचे दाखवून मेडीक्लेम मंजूर केल्याचा प्रकार उघडकीस आला.
फसवणुक झालेल्या गुप्ता यांनी न्यू इंडिया पॉलीसी कॉप लिमी कंपनीकडून संपुर्ण माहिती जाणून घेतली. त्यानुसार त्यांनी जळगावातील अजिंठा चौफुलीवरील टायटन मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटलचे डॉ. इम्रान बी. नाईकवाडी व जोगेश्वरी पॅथॉलॉजीचे व्यवस्थापकांविरुद्ध गुप्ता यांनी दिल्ली पोलीसात तक्रार दाखल केली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो एमआयडीसी पोलीसात वर्ग करण्यात आला आहे.
हा गुन्हा एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर तपासाधिकाऱ्यांनी माहिती घेतली असता सदर हॉस्पिटल तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे. त्यातील डॉक्टरांचा शोध घेण्यासह कागदपत्रे कशी मिळविली, लॅबचा रिपोर्ट घेताना कोणाचे नमुने घेण्यात आले, यासह विमा कंपनीकडून किती रक्कम मिळविली, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.



