मुंबई : वृत्तसंस्था
प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच अधिराज्य गाजविणारा अभिनेता सलमान खान हा नेहमीच विविध कारणाने नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसापासून अभिनेता खान हा ‘सिंकदर’ चित्रपटामुळे चर्चेत असतांना आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आले आहे. सलमानच्या या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहत्यांकडून मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जात होती.
सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबत चाहत्यांना माहिती दिली. हा चित्रपट आधी 28 मार्चला, शुक्रवारच्या दिवशी रिलीज होणार होता, पण आता त्याच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. ‘सिकंदर’ चित्रपट 30 मार्चला प्रदर्शित होईल. सलमान खानने इन्स्टाग्रामवर त्याचा तलवार धरलेला फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, “30 मार्च रोजी वर्ल्डवाइड थिएटरमध्ये भेटूया.” 30 मार्चला गुढीपाडवा असणार असून, ईद 31 मार्चला सोमवारला आहे.
साधारणपणे चित्रपट शुक्रवारी रिलीज होतात, पण सलमानचा ‘सिकंदर’ चित्रपट 30 मार्चला संपूर्ण जगभरात रिलीज होणार आहे. या दिवशी सिनेमाघरात मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची उपस्थिती अपेक्षित आहे. तथापि, चित्रपटाला लॉन्ग वीकेंडची कमाई मिळणार नाही. त्यामुळे ‘सिकंदर’ रविवारी बॉक्स ऑफिसवर धमाल करणार का? की पहिल्या दिवशीच कमाईत घट होईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चित्रपटाच्या अॅडवान्स बुकिंगची प्रक्रिया २४ फेब्रुवारीपासून परदेशात सुरू झाली आहे. सलमान खानसोबत या चित्रपटात साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘बाहुबली’ चित्रपटातील कटप्पा, म्हणजे अभिनेता सत्यराज हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘सिकंदर’ चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास यांनी केले आहे.
