छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने फोन करून एका शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला बावनकुळे साहेबांचे पर्सनल असिस्टंट असल्याचे भासवत शेतकऱ्याला फोन केला आणि त्याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने स्कॅनर पाठवून पैसे पाठवण्याची मागणी केली होती.

शेतकऱ्याला संशय आल्यावर त्याने तात्काळ छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस सायबर फसवणुकीच्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
जगन्नाथ जयाजी शेळके असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर आपली अडचण मांडली होती. त्यांनी पोस्टद्वारे सांगितले की, आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवून त्यांच्या वडिलोपार्जित शेतीवर अतिक्रमण केल्यामुळे लागवड करणे शक्य होत नाही. ही बाब शेअर केल्यानंतर काही वेळातच एका अज्ञात व्यक्तीने फोन करून स्वतःला बावनकुळे साहेबांचा पी.ए. असल्याचे भासवले आणि शेतकऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या व्यक्तीने रस्त्याची मोजणी करण्यासाठी माणसे पाठवतो असे सांगत, पोलीस बंदोबस्तासाठी पैसे भरण्याची मागणी केली. यासाठी त्याने क्यूआर कोड पाठवत पैसे पाठवण्यास सांगितले. या फोनवर दोघांमध्ये संवादही झाला असून, शेतकऱ्याने त्या संभाषणाचा रेकॉर्ड पोलिसांकडे सादर केला आहे. यावरून छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. पीडित शेतकरी जगन्नाथ जयाजी शेळके यांच्याकडून अज्ञात व्यक्तीने अशाप्रकारे दोन वेळा पैशांची मागणी केली. सुरुवातीला आपले काम मार्गी लागेल, या आशेने शेतकऱ्याने 3 हजार रुपये पाठवले देखील. मात्र, त्यानंतरही पुन्हा पैशांची मागणी सुरू राहिल्याने त्यांना फसवणुकीचा संशय आला. त्यामुळे शेवटी त्यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा वापर करून शेतकऱ्याची फसवणूक करणारा हा अज्ञात व्यक्ती नेमका कोण आहे, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. सद्यस्थितीत पोलिसांनी शेतकरी आणि आरोपी यांच्यातील कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे पुढील तपास सुरू केला असून, फसवणुकीचा हा प्रकार गंभीरतेने घेतला जात आहे.



