Home » जळगाव » अमळनेर » शेडनेटच्या आमिषाला शेतकरी बळी; नावावर ७ लाखांचे कर्ज, एजंटसह दोघांवर गुन्हा !

शेडनेटच्या आमिषाला शेतकरी बळी; नावावर ७ लाखांचे कर्ज, एजंटसह दोघांवर गुन्हा !

अमळनेर : प्रतिनिधी

शेडनेट मंजुरी मिळवून देण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याच्या नावावर सात लाख रुपये कर्ज काढून त्याची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २०२० मध्ये घडलेल्या या प्रकरणात तब्बल पाच वर्षांनंतर दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मधुकर गरबड पाटील (रा. नेरपाट, ता. पारोळा) यांच्या अमळनेर तालुक्यातील सडावण येथील शेतासाठी पोखरा योजनेत त्यांनी २०२० मध्ये अर्ज केला होता. त्यावेळी समाधान पंडित शेलार व त्याचा साथीदार उद्धव कुवर या दोघांनी स्वतःला एजंट म्हणवत शेडनेट मंजुरीसोबतच कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर युनियन बँकेत नेऊन काही कागदपत्रांवर पाटील यांचे अंगठे घेतले.

नंतर सोनेवाडी (ता. शिंदखेडा) येथील कंपनीतील कामगारांनी त्यांच्या शेतात शेडनेटसाठी खांब उभारले; मात्र प्रत्यक्ष शेडनेट बसवण्यात आले नाही. काही महिन्यांनी युनियन बँकेची नोटीस मिळताच पाटील यांना धक्काच बसला. त्यांच्या जमिनीवर तारण ठेवून सात लाखांचे कर्ज काढले असून व्याजासहित ते आता ११ लाखांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले.

हेही स्पष्ट झाले की, कर्जाची पूर्ण रक्कम १८ फेब्रुवारी २०२० रोजी ‘ओम अॅग्रो सर्व्हिसेस, सोनेवाडी’ यांच्या खात्यावर वळती करण्यात आली होती. अखेर पाच वर्षांनी पाटील यांनी पोलिसात धाव घेतली आणि अमळनेर पोलिस ठाण्यात शेलार व कुवर या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *