Home » राष्ट्रीय » अवैध वाळू कारवाईदरम्यान महसूल-पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला; ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त !

अवैध वाळू कारवाईदरम्यान महसूल-पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला; ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त !

भडगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील गिरड परिसरात गिरणा नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल आणि पोलीस पथकावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ३० डिसेंबरला मध्यरात्री घडली. याप्रकरणी पाचोरा येथील मुख्य संशयित रितेश पाटील ऊर्फ आबा याच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रशासनाने सुमारे ३७ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा नदी पात्रात अवैधरित्या वाळूचे उत्खनन आणि वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे महसूल सहाय्यक प्रशांत सावकारे, मिलिंद निकम, रामकृष्ण मनोरे व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास गस्त सुरू केली. रात्री १० वाजेच्या सुमारास गिरड ते मांडकी रस्त्यावर वाळूने भरलेले एक जेसीबी, ट्रॅक्टर आणि २ डंपर या पथकाला आढळून आले. दरम्यान, त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता चालकांकडे कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे पथकाने वाहने जप्त करण्याचा प्रयत्न केला असता. चालकांनी अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला.

काही वेळातच घटनास्थळी २० ते २५ जणांचा जमाव गोळा झाला. यामध्ये पाचोरा येथील रितेश पाटील (ऊर्फ आबा) हा काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून आपल्या साथीदारांसह दाखल झाला. त्याने सरकारी कामात अडथळा आणत महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांना धमकावून धक्काबुक्की केली. तर इतक्यावरच न थांबता, जमावाने आरडाओरड करत पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली, त्यानंतर जमाव पांगला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पथकाने धाडस दाखवत सर्व वाहने ताब्यात घेतली. जप्त केलेल्या मुद्देमालात १५ लाखाचे जेसीबी, २ लाख २८ हजाराचे सोनालिका ट्रॅक्टर व किन्ही, २० लाखाचे २ डंपर (वाळूसह) असा एकूण ३७ लाख २८ हजाराचा मुद्देमाल प्रशासनाने ताब्यात घेतला. तर अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही आणि अशी कडक कारवाई सुरूच राहिल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या गंभीर प्रकारानंतर भडगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार ज्ञानेश्वर पाटील करत आहेत.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *