Home » राष्ट्रीय » बाप-लेकाचा हल्ला : गोळीबार करत १६ नागरिकांना केले ठार !

बाप-लेकाचा हल्ला : गोळीबार करत १६ नागरिकांना केले ठार !

सिडनी : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील बॉन्डी बीच येथे रविवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृतांची संख्या वाढून १६ वर पोहोचली आहे. या हल्ल्यात १० वर्षांची चिमुकली मुलगी आणि एका इस्रायली नागरिकाचाही मृत्यू झाला असून, ४५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बॉन्डी बीचवर हनुक्का उत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांवर बाप-लेकाने अंदाधुंद गोळीबार केला. जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, हे दोघे पाकिस्तानी वंशाचे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हल्लेखोर ५० वर्षीय साजिद अक्रम याला पोलिसांनी घटनास्थळीच गोळ्या घालून ठार केले, तर त्याचा २४ वर्षीय मुलगा नवीद अक्रम याला अटक करून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एनएसडब्ल्यू पोलीस आयुक्त मल लॅनयन यांनी सांगितले की, साजिद अक्रमकडे परवानाधारक बंदूक होती, जी तो शिकारीसाठी वापरत होता. तो एका गन क्लबचा सदस्य होता आणि राज्याच्या कायद्यानुसार त्याच्याकडे एकूण सहा कायदेशीर बंदुका होत्या. विशेष म्हणजे, हल्ल्यापूर्वी बाप-लेकाने आपल्या कुटुंबाला मासेमारीसाठी जात असल्याचे सांगितले होते. साजिद अक्रम कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होता.

दरम्यान, या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ऑस्ट्रेलियन सरकारवर तीव्र टीका केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या धोरणांमुळे देशात ज्यूविरोधी (अँटीसेमिटिझम) भावना वाढीस लागल्याचा आरोप नेतन्याहू यांनी केला. त्यांनी सांगितले की, १७ ऑगस्ट रोजी त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना पत्र लिहून याबाबत इशारा दिला होता. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा भयानक हल्ला घडल्याचा दावा नेतन्याहू यांनी केला आहे.

या घटनेनंतर ऑस्ट्रेलियात मोठी खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *