मुंबई : वृत्तसंस्था
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सणाच्या काळात मुंबईतील बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर सरासरी प्रतिकिलो 4 रुपयापासून ते 10 रुपयांपर्यंत वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकाला याचा फटका बसत आहे. दरम्यान, दर वाढले असले तरी ग्राहकांची मागणी कमी झाली नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
मुंबईमध्ये शेंगतेल गुजरात येथील राजकोट, कर्नाटकमधील विजापूर,गोंधळा या जिल्ह्यातून, तर छत्तीसगड येथील रायपूर येथून राईस ब्रॉन,कोल्हापूर जिल्ह्यातून सोयाबीन तेल यासह मध्य प्रदेश,राजस्थान राज्यांमधून खाद्यतेलाची आवक मोठ्या प्रमाणात होते.शेंगदाणा,सूर्यफूल खाद्यतेलाचे दर स्थिर असून ते प्रतिकिलो 160 रुपये इतके आहे.तसेच सोयाबीन तेल सुमारे 140 रुपये किलो आहे. मात्र; सोयाबीन तेल हे मुंबईत कोणी फारसे वापरत नसल्याने ग्राहकांची याला मागणी कमी आहे. मुंबईबाहेर सोयाबीन प्रतिकिलो दर हा 135 रुपयांपासून ते 140 रुपयांपर्यंत आहे.
याचबरोबर मुंबईत राहणार्या उत्तर प्रदेशातील बहुतांश ग्राहकांची मोहरी तेलाला पसंती आहे. मोहरी तेलाचा दर 170 रुपये इतका आहे.युक्रेन युद्धानंतर मुंबईतील बाजारात युक्रेनऐवजी रशिया मधून सूर्यफूल तेल येते. शेंगतेलबरोबर सूर्यफूल तेलाला ग्राहकांची मागणी जास्त असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
दादर येथील विक्रेते उमंग डुंगार्शी म्हणाले, यावर्षी सणामध्ये तेलाची आवक बर्यापैकी आहे. बाजारात खाद्यतेलाचे दर वाढले असले तरी विक्री कमी झालेली नाही.तेलाचे दर महिन्याला बदलत असल्याने दर चढ-उतार होतात.
सरकी तेल आरोग्याला हितकारक व सर्वसामान्य ग्राहकाला परवडणारे आहे.सध्या बाजारात 130 रुपयेपासून ते 140 रुपयेपर्यंत सरकी तेलाचा दर आहे. महाराष्ट्रातील धुळे, लातूर या जिल्ह्यांसह व मराठवाड्यातून सरकी तेलाचे उत्पादन होते.पण; सरकी तेलाला ग्राहकांची मागणी कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
