चाळीसगाव : प्रतिनिधी
भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावरील प्राणघातक हल्लाप्रकरणी तीन जणांना शनिवारी अटक करण्यात आली. त्यांनी हल्ला केला त्याच भागातून त्यांची धिंड काढण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, सोमा उर्फ सागर दगडू चौधरी (३०), सनी उर्फ हरीष आबा पाटील (२०) आणि गौरव आधार चौधरी (१९, सर्व रा. चाळीसगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून प्रभाकर चौधरी यांच्यावर २६ ऑगस्ट रोजी रात्री कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित लागलीच पसार झाले होते. वरील तीनही जण ३० रोजी चाळीसगावातील एका हॉटेलकडे कारने येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या भागात नाकाबंदी केली. यात वरील तीनही जणांना अटक करण्यात आली. यातील चौथा संशयित नाना उर्फ शिवाजी पाटील मात्र पसार आहे
आरोपींनी माजी नगरसेवकावर ज्या भागात हल्ला केला होता, त्याच भागातून आरोपींची पायी धिंड काढण्यात आली. दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या तिन्ही जणांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश माळी हे पुढील तपास करीत आहेत
